Login

"काय माझा गुन्हा..." भाग ६

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६



"काय माझा गुन्हा...?" भाग ६


पावसाचा मारा जरा कमी झाला होता, पण थंडी तिच्या अंगात खोलवर शिरली होती...

गौरवी हळूहळू चालू लागली...
पण 'कुठे जायचं...?  का जायचं...?'
याचं तिलाच उत्तर माहीत नव्हतं...

रस्त्यावरील दिवे धूसर प्रकाश टाकत होते,
ओल्या डांबरी रस्त्यावर तिची सावली तुटक-तुटक दिसत होती,
जशी तिची स्वतःची ओळखच आज त्या दरवाजाबाहेर तुटून पडली होती...

एका बंद बसस्टॉपच्या शेडखाली ती थांबली...
ओल्या साडीचा पदर अंगाला चिकटला होता,
केस विस्कटले होते..., रडून रडून डोळे लाल झाले होते...

पण अश्रूने आता येणं बंद केले होते...
जणू शरीराने रडून रडून मनालाच सोडून दिलं होतं...

तिने स्वतःलाच मिठी मारली... कारण मनात भीती होती... तीही रात्रीची..., एकटेपणाची... आणि उद्याच्या अनिश्चिततेची...

“मी चुकले का...? माझा काय गुन्हा...? कसली शिक्षा भोगतेय मी...? प्रेमाची...? कि कमी जातीत जन्माला आली याची...? कि उच्च जातीच्या मुलाशी प्रेम विवाह केला याची...? नक्की कोणती शिक्षा भोगतेय‌‌...?" असे एक ना अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढत होते...

पण लगेच दुसराच आवाज आतून उमटला...
“मी चुकले नाही… मी काहीही गुन्हा केला नाही... माझा कोणताही दोष नाही... उलट माझ्यावरच अन्याय झाला आहे..."
अशा अनेक विचाराने तिच्या मनात काहीतरी हललं...

फोन बॅगेत होता, पण हात पुढे जाईना...
"आईला फोन करावा का...? आणि वडिलांना काय सांगावं...?
नवऱ्याने घराबाहेर काढलं..." हे शब्दच तीला जड वाटत होते...

क्षणभर माधवचा चेहरा डोळ्यांसमोर आला...
पूर्वीचा, हसरा, प्रेमळ माधव... आणि आज तोच माणूस
तिच्या शब्दांवर विश्वास ठेवायला तयार नव्हता...
त्या जाणिवेने तिचं हृदय पुन्हा एकदा तुटलं...
पण यावेळी ती कोसळली नाही...

शेडच्या कठड्यावर बसून तिने दीर्घ श्वास घेतला....
हाताच्या मुठी आवळल्या आणि पहिल्यांदाच ती
स्वतःशी ठामपणे बोलली...
“मी जिवंत आहे... मी श्वास घेतेय... आणि जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत मी हरलेली नाही...”
त्या एका वाक्याने तिच्या आत कुठेतरी
एक सूक्ष्म ठिणगी पेटली...

रात्र अजून संपलेली नव्हती... वेदना अजून तिथेच होत्या...
भीतीही होती... पण आता त्यांच्याबरोबर एक नवं काहीतरी उभं राहत होतं...
आणि तो म्हणजे... 'स्वतःवरचा विश्वास...'

गौरवी उठली... ओल्या कपड्यांची,  अंगाला थंड झोंबणारा वारा... याची तिला आता फारशी पर्वा उरली नव्हती...

ती चालू लागली... पुढे, अंधारात, पण पहिल्यांदाच स्वतःच्या बाजूने...

ही फक्त एक रात्र होती... पण हीच रात्र
तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लढ्याची
शांत सुरुवात ठरणार होती…

रस्ता अधिकच ओस पडत चालला होता...
पावसाची रिपरिप आता थांबली होती,
पण हवेत एक थंड, बेचैन शांतता पसरली होती...

गौरवी चालत होती... पावले थकलेली होती...,
देह थंड होत होता..., पण मन मात्र सतत सावध होतं...
तेवढ्यात मागून हसण्याचा हलकासा, कर्कश आवाज आला...

आणि ती थांबली..., तीने मागे वळून पाहिलं,
तर रस्त्याच्या कडेला उभे असलेले तीला तीन-चार पुरुष..., हसत असलेले आणि चेहऱ्यावर एक वेगळेच भाव घेऊन ते उभे असलेले दिसले...

त्यांच्या नजरा…
त्या नजरा काहीतरी वेगळंच सांगत होत्या...
त्या नजरा गौरवीच्या शरीरावरून घसरत होत्या... तीच्या कपड्यांच्या आत डोकावणाऱ्या... आणि शरीराचे अवयव मोजणाऱ्या होत्या...
जणू समोर उभी असलेली ती स्त्री एक माणूस नसून
एखादी वस्तूच असावी....

गौरवीचं काळीज दडपून गेलं...
ती भरभर चालू लागली..., ‌तीची पावले वेगात पडू लागली...
आणि त्यांचीही पावले तितक्याच वेगाने पडू लागली... तेही भरभर चालू लागले...

आणि तेवढ्यात त्यातील एक नराधम मोठ्या आवाजात म्हणाला...
“ए… थांब ना…"

"अगं इतक्या रात्रीची तु एकटी कुठं चाललीस...?”
दुसऱ्याने कुचेष्टेच्या सुरात हसत म्हटलं...

ती काहीच बोलली नाही... कारण तीच्या ह्रदयाची धडधड जोरजोरात वाजू लागली... त्यामुळे जेवढ्या स्पीडने ह्रदयाची धडधड वाढली होती... तेवढ्याच स्पीडने तीने फक्त चालण्याचा वेग वाढवला होता...

पण अचानक एक हात तिच्या मनगटावर घट्ट आवळला गेला...
“सोडा मला...!” ती दचकून, घाबरून ओरडली...

दुसरा पुढे आला... आणि त्याने तिचा रस्ता अडवला...
“एवढी घाबरतेस कशाला..?"

"आम्ही काही खाणार नाही तुला…”
तिसरा विकृत हसत म्हणाला...

गौरवीचा श्वास अडखळला... भीतीने तीचे अंग थरथर कापू लागले...
तिने आपला  हात त्याच्या हातातून सोडवण्यासाठी जोरात हात झटकला, तीने सुटण्याचा प्रयत्न केला...
“मला जाऊ द्या… प्लीज… मला त्रास देऊ नका…”
तिचा आवाज थरथर कापत होता...

पण त्यांच्या नजरेत दया नव्हती... होती ती फक्त वासना आणि पुरुषार्थ गाजविण्याची सत्ता होती....

तिने पुन्हा ओरडण्याचा प्रयत्न केला...
“मदत करा… मदत करा... कोणी तरी प्लीज मला मदत करा… ”

तीच्या असाह्य तडफडण्यावर , सुटण्यासाठी होणारी तिची खटपट पाहून ते अधिकच चेकाळत ओरडू लागले आणि दात काढून तिच्यावर हसू लागले...

"तुला इथे यावेळी वाचवण्यासाठी साधं चिटपाखरूही नाही आहे... मग तुझा हा गोड मधाळ आवाज कोण ऐकणार...?" ज्याने तिचा हात पकडला होता तो असं म्हणू लागला... आणि असं म्हणताच त्याने तीचा हात जोरा ओढून आपल्या जवळ खेचला... आणि गौरवी त्याच्या छातीवर जाऊन आदळली... त्या नराधमाने तिला आपल्या बाहुपाशात घट्ट धरले..‌. आणि गौरवी जोरजोरात ओरडू लागली...
" वाचवा... कोणीतरी मला वाचवा..."


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all